Tuesday, May 31, 2016

'सैराटच्या' निमित्ताने

एक साधू एका गावच्या नदीकाठच्या मंदीरात वास्तव्यास असे. दररोज सकाळी एक गवळण नदी पार करून मंदिरात दुध पोहोचवण्यासाठी येत असे. कधी कधी तिला साधुबाबांच्या प्रवचनाचाही लाभ व्हायचा. एकदा साधुबाबा म्हणाले की, ' जर आपण मनोभावे परमेश्वराचे स्मरण केले आणि स्वतःला त्याच्या ठायी अर्पण केले तर परमेश्वर आपल्या मदतीसाठी कुठेही धावून येतो'. गवळणीला साधुबाबाचे हे वाक्य लक्षात राहिले. एकदा त्यागावात धो-धो पाउस कोसळला. नदीला महापुर आला. गवळणीला नदी पार करून घेउन जायला कुठलाच नावाडी तयार होइना. पण गवळण साधुबाबासाठी दुध घेवून मंदिरात हजर होते. साधुला प्रश्न पडतो कि गवळण नदी पार करून कशी आली. साधू तिला याबाबत प्रश्न विचारतो. गवळण उत्तरते - "आपणच म्हणाला होता कि,  मनोभावे परमेश्वराचे स्मरण केले तर परमेश्वर आपल्या मदतीसाठी कुठेही धावून येतो. मी माझ्याकडे असलेली हि चटइ पाण्यावर टाकली. डोळे बंद केले आणि परमेश्वराला स्मरुण म्हटले या चटइ वरून मला पैलतीरी घेउन चल. आणि मी इथवर आले. आपण किती विद्वान आहात."
मतीतार्थ हा कि, कधीकधी आपल्या दररोजच्या जीवनातील सामान्य माणसे सुद्धा विद्वानाला जमणार नाही असे असामान्य कार्य करून जातात.



सध्या 'सैराट' हा मराठी सिनेमा सगळ्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे अगदी NDTV या हिंदी-इंग्रजी चॅनलने तसेच परदेशी प्रसार माध्यमानेसुद्धा याची दखल घेतली आहे. हा सिनेमा तसा वेगळ्या धाटनीचा बनलाय. ग्राम्य पार्श्वभुमी असलेल्या 'आर्ची' आणि 'परश्याची' ही कहानी आणि त्यातील इतर पात्रे. न याच्यात कोणी मोठा कलाकार आहे ना कोणी मोठे नाव. दररोजच्या जगण्यातील पात्रे आहेत आणि दररोजच्या धावपळीत भेटतील असे चेहरे आहेत. ग्रामिण भागात असलेले राजकारणी प्रस्त, ग्राम्य भाषा, तेथील क्रिकेटचे सामने, व्यवसाय (सायकलचे दुकान), विहीर, परश्याचे दिलदार मित्र, मित्रांमध्ये असलेली टोपन नावे... सगळे काही जशेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न 'नागराज मंजुळे'ने केला आहे .



याअगोदर नागराजने 'पिस्तुल्या' हा लघुपट आणि 'फँड्री' हा चित्रपट बनवला होता. दोन्हींचे तेवढेच कौतुक झाले होते. असे ऐकले आहे कि, नागराजने सैराटच्या कलाकारांना केवळ 'संवाद' आणि 'कथानक' दिले आणि बाकी सर्व त्यांच्यावर सोडून दिले. या कलाकारांची पुर्वीची अभिनयाची पार्श्वभुमी नसल्याने त्यांनी फुकाचा अभिनय केलाच नाही. आपल्या दररोजच्या वागण्या-बोलण्यातला नैसर्गिकपणा त्यांनी त्यात आणला. त्यांना ते कृत्रीमरित्या, आव-आणून करावे लागले नाही कारण नाटकीय-अभिनय काय असतो हा प्रकारच त्यांच्यासाठी नवीन होता. यामुळे 'नजरेतला अभिनय', 'पहाडी संवाद', 'Larger than Life' प्रतीमा असलेला आणि दहा-दहा गुंडांना एकट्याने लोळवणारा नायक इथे दिसत नाही, दिसतो तो हातपंपातून पाणी भरणारा, नजर चुकवून क्रिकेट खेळणारा, वेळप्रसंगी हातगाडीवर काम करणारा निरागस परश्या. त्याच्या मित्रांचेही तसेच .कोणीही चारचाकितून अचानक रात्री गोव्याला घेउन जायला येणारा  इथे कुणी नाहिये (संदर्भ - दिल चाहता है). मळकट कपडे, मावा खाउन किडलेले दात, दररोजच्या अर्थार्जनासाठी चालवावे लागलेले पंक्चरचे दुकान... सगळे कसे आजुबाजुला घडते आहे असे वाटावे.  आर्चीची भुमिकाही तितकीच नैसर्गिक आहे. बुलेट,ट्रॅक्टर चालवणारी, खो-खो खेळणारी, विहीरीत पोहणारी निरागस,अल्लड आर्ची रिंकू राजगुरुने चांगली रंगवली आहे (त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाला आहे.) अजय-अतुल ने 'झिंगाट'च्या तालावर परदेशातही लोकांना नाचवले आहे. त्यांनी पाश्चात्य संगितात लोकप्रिय असलेल्या Symphony चा प्रयोग चित्रपटात केला आहे. संवादात आजीबातच जड भाषेचा प्रयोग केलेला नाही त्यामुळे फारच काळजीपुर्वक न ऐकता ते सहज घेता येतात (नाहीतर ' जिंदगीमे कुछ चिजे फायदे और नुकसानसे उपर होती है। लेकीन कुछ लोग इसे नही समझते'  (संदर्भ - 'त्रिशुल' चित्रपट) हा Dialog जरा कान देउनच ऐकावा लागतो.) कथानक मध्यांतरानंतर जरा करुण (Sentimental) होते पण ते एका सत्य घटनेवर (Honor-Killing) आधारीत आहे असे ऐकले.

बच्चन साहेबांनी सांगितलेली  एक गोष्ट इथे नमुद कराविशी वाटते, ते म्हणतात 'Indian Cinema portrays Escapism and believe in Poetic-Justice' (भारतीय चित्रपट पलायनवाद दर्शवतात आणि काव्यत्म न्यायावर आधारित असतात). याचा अर्थ असा कि, प्राप्त परिस्थीतीतून भारतीय मनाला कमीत कमी ३ तासांसाठी सुटका हवी असते त्यामुळे जे सत्यात येउ शकत नाही अशा गोष्टी भारतीय मन पडद्यावर पाहते. त्यात त्याला शेवटी चांगल्याचा/सत्याचा  वाइटावर/असत्यावर विजय झालेला हवा असतो. (पण चांगल्याचा/सत्याचा विजय शेवटीच का होतो? अगोदरच का नाही? हे न सुटलेले कोडे आहे). बऱ्याच जणांना या चित्रपटाचा शेवट हृ्दयद्रावक वाटतो. पण कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही भयाण असते (At times reality is much STRANGER than fiction). ते स्विकारायलाच लागते.

काही महिन्यांपुर्वी 'Taxi' या इराणी चित्रपटाला एका 'Film Festival' मध्ये मानाचा पुरस्कार मिळाला. इराणमध्ये माध्यमांवर बरीच बंधने आहेत त्यामुळे 'जफर पनाही' या निर्मात्याने हा चित्रपट HandyCam ने चित्रित केला. त्याची VCD बनवून त्याने छुप्यामार्गाने पॅरिसला पाठवून दिली. तेथील 'Film Festival' मध्ये त्याला पुरस्कार मिळाला. हा चित्रपट पुर्णपणे Taxi मध्येच चित्रित होतो. त्यात प्रवास करणाऱ्या कुणालाही हे चित्रीत होत असल्याची जाणीव नव्हती त्यामुळे चित्रपट आजीबात कृत्रीम वाटत नाही.




वरिल कहानीतील गवळणीप्रमाणे कधी-कधी सामान्य माणसांकडुनसुद्धा असामान्य काम घडते. सैराट त्याचे एक उदाहरण आहे. यातील कलाकारांमागे कुठलेही वलय (Stardom) नाही, अभिनयाच्या शाळेतील नाटकीपणा (Artificialness) नाही तरीही जनमनाचा ठाव घेणारी एक कलाकृती त्यांनी तयार केली आहे. तद्द्न गल्लाभरु (BoxOffice) मसालापटापेक्षा वेगळ्या धाटणीचे आशयप्रधान (content-based) आणि वास्तववादी (Realistic) चित्रपट पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक प्रगल्भ होत आहे. सैराट त्या मार्गावर एक चांगला प्रयोग ठरो !!! 

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया जरुर नोंदवा)

Monday, February 29, 2016

आणि विश्व बोलू लागले - भाग-२


गुरुत्वलहरी (Gravitational Waves) म्हणजे काय? याची पार्श्वभुमी आपण मागील भागात (आणि विश्व बोलू लागले - भाग-१) घेतली. आता जरा LIGO ने केलेल्या प्रयोगाबाबत माहीती घेउयात.
  • LIGO ने पकडलेल्या गुरुत्वलहरी
१२-सप्टेंबर-२०१५ या दिवशी अमेरिकेतल्या प्रयोगशाळांना प्रथमतःच गुरुत्वलहरी पकडण्यात यश आले. परंतु या लहरींची वैधता (Authenticity) तपासुन पाहून ते अधिकृत जाहीर करण्यात आले ११-फेब्रुवारी-२०१६ या दिवशी.  या पकडलेल्या गुरुत्वलहरीला नाव देण्यात आले  'GW150914'.

पृथ्वीपासून १.३ अब्ज प्रकाशवर्षाच्या (1.3 billion lightyears) अंतरावर असलेल्या आणि एकमेकांभोवती पिंगा घालणाऱ्या दोन कृष्णविवरांच्या (BlackHoles) मिलनातून (Merger) या गुरुत्वलहरी बाहेर पडल्या. त्यापैकी एका कृष्णविवरांचे वजन आपल्या सूर्याच्या ३६-पट तर दुसऱ्याचे २९-पट होते. या घटनेत ३-सूर्य मावतील इतकी उर्जा बाहेर पडली अर्थातच ती बरीचशी गुरुत्वतरंगांच्या रुपात इतरत्र पोहोचली.



आता जरा त्या दोन कृष्णविवरांच्या मिलनाचा घटनाक्रम समजावून घेउयात.



वरील दाखवलेल्या चित्रात आणि आलेखात आपण स्पष्ट पाहू शकता की जेंव्हा ही कृष्णविवरे एकमेकांभोवती पिंगा घालत घालत जवळ येतात (Inspiral, Merger, Ring-Down) तेंव्हा ते वेगवेगळ्या क्षमतेच्या (Strain) गुरुत्वलहरी उत्सर्जीत करतात. हि कृष्णविवरे कित्तेक लाख वर्षे एकमेकांभोवती फिरत होती. तेंव्हाही त्यांच्या फिरण्यातुन गुरुत्वलहरी बाहेर पडतच होत्या परंतु त्या कमी क्षमतेच्या असल्यामुळे पृथ्वीवर पकडण्यात येउ शकल्या नाहीत. त्यांच्या मिलनाच्या वेळी मात्र जास्त क्षमतेच्या गुरुत्वलहरी बाहेर पडल्या त्यामुळे त्या पृथ्वीवरील LIGO ला पकडता आल्या. या कृष्णविवरांचा मिलन कालावधी अगदी काही सेकंदाचाच होता हे विशेष !!! या गुरुत्वलहरींनी साधारणपणे ५०,००० वर्षांपुर्वी आपल्या आकाशगंगेत प्रवेश केला ज्यावेळी पृथ्वीवर मानवप्राण्याच्या अगदी आदीम जमातीचे (Homo-sapience) वास्तव्य होते.

अमेरिकेतल्या Hanford (Washington) आणि Livingston (Louisiana) येथील LIGO ने पकडलेल्या गुरुत्वलहरींचा आलेख खालील प्रमाणे आहे.




आता जर या दोन ठिकाणावरील लहरी (Hanford- लाल-रंग,  Livingston- निळा-रंग) एकमेकांवर ठेवल्या तर त्या बऱ्याच अंशी सारख्या आहेत अशा वाटतात. एकप्रकारे निसर्गाने आपल्या गुरुत्वलहरींच्या ज्ञानावर केलेले हे शिक्कामोर्तबच आहे.


हि घटना घडली त्याचा ध्वनीसुद्धा आपण ऐकू शकता ( त्यासाठी खालील ध्वनीफीत Play करावी ). एकप्रकारे गुरुत्वलहरींच्या माध्यमातून विश्व आपल्याशी बोलू लागले आहे.



  • भविष्यातल्या आशा
१.३ अब्ज वर्षांपुर्वी विश्वात घडलेली ही घटना पृथ्वीवर आत्ता समजते आहे. एकप्रकारे आपण विश्वाच्या भुतकाळात तर डोकावत नाही ना ? असा प्रश्न पडतो. याशोधामुळे भुतकाळातील घटना याची देही याची कानी ऐकणे शक्य होतील अशी एक आशा निर्माण झाली आहे. कदाचीत हे विश्व जेंव्हा निर्माण झाले त्यावेळी घडलेल्या घटना आपल्या पर्यंत जर गुरुत्वलहरींच्या माध्यमातून पोहोचल्या तर त्यावेळचा प्रसंग आपल्या समोर उभा केला जाउ शकतो. एकप्रकारे हा भुतकाळात मारलेला फेरफटकाच आहे ('Time Travel in past').

या  शोधामुळे हे विश्व (Universe) अभ्यासन्याचे एक वेगळे दालन (Gravitational Wave Astronomy) मानवापुढे उघडले आहे यात मात्र शंकाच नाही.

ता.क. - इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख करावीशी वाटते ती अशी कि, 'चित्रलेखा' या नावाजलेल्या आणि सर्वाधीक मराठी वाचकवर्ग असलेल्या साप्ताहिकाने त्यांच्या २८-मार्च-२०१६ च्या अंकात प्रस्तुत लेखमालेची दखल घेतली आहे. 


                        ( चित्रलेखा - २८-मार्च-२०१६ )

  (PDF link - चित्रलेखा - २८-मार्च-२०१६

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)

Saturday, February 13, 2016

आणि विश्व बोलू लागले - भाग-१

ट्रिंग ट्रिंग !!! 
 "नमस्कार !!! काय राव किती दिवसानंतर तुमचा नंबर मिळालाय !!! आपली एवढी वर्षे एकमेकांचा नंबर शोधण्यातच गेली. चला उशीरा का होइना तुमचा नंबर लागला. मला तुम्हाला माझ्या जन्मापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी नुसत्या सांगायच्याच नाही तर ऐकवायच्या सुद्धा आहेत. काय? मी कोण आहे हे ओळखले नाही आपण? अहो मी आपला 'विश्व' (Universe) ज्याच्यामध्ये तुम्ही रहाता. काय तयार आहात ना मग? मी पुन्हा आपल्याला कॉल देइन "

वरील मनोगत एखाद्या स्वप्नातले वाटते ना? पण खरे असे आहे कि, हे दिवास्वप्न आता सत्यात उतरण्याची दाट शक्यता आहे आणि मागिल काही दिवसांत 'खगोलशास्त्रात' (astronomy) मोलाची भर टाकेल 'अशी एक घटना घडली कि त्यामुळे या शास्त्रात एक मैलाचा दगड (milestone) गाठता आला असेच म्हणावे लागेल. 

अमेरिकेत Louisiana आणि Washington या परगण्यात तसेच इटलीमधील Virgo येथील The Laser Interferometer Gravitational-Wave Observatory (LIGO) निरिक्षण-कक्षाने दिलेल्या हवाल्यानुसार त्यांना 'गुरुत्वलहरींचे (Gravitational Waves) अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळाले आहे'  प्रश्न असा पडतो कि, दररोज ढिगाने संशोधनाचे शोध-निबंध प्रसिद्ध होतात, शोध लागतात मग या गुरुत्वलहरींचे काय असे नाविन्य? त्याचा आइन्स्टाइनच्या १०० वर्षापुर्वी केलेल्या संशोधनाशी काय संबंध ? त्याची या विश्वातली गुपिते उकलण्यात काय मदत मिळणार? चला या गोष्टी एकमेकांत कशा गुंफल्या आहेत ते पाहू आणि गुरुत्वलहरींना 'विश्वाचा आवाज' (Sound of Universe) का म्हटले आहे ते जाणून घेउ.

आइन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत (General Theory of Relativity)

आइन्स्टाइनने त्याचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत १९१५ साली मांडला. त्यात त्याने असे सिद्ध केले कि, गुरुत्वाकर्षण (Gravity) म्हणजे प्रचंड वस्तुमानाच्या (mass) वस्तुमुळे त्या सभोवतालच्या अवकाशाला (space) आलेली वक्रता (curve) आहे. तसेच त्याने हे ही सिद्ध केले की, अवकाश(space) आणि वेळ(time) या एकाच नाण्याचा दोन बाजू असून त्या एकमेकावर प्रभाव करतात. यालाच अवकाश-काल (Space-Time) असेही म्हटले जाते (या गोष्टींवर विस्तृत विवेचन आपण माझ्या 'मनमोकळं' या अनुदिनीवरील (Blog) 'INTERSTELLAR समजुन घेतांना' या मालिकेमधील ३ भागांत (भाग-१, भाग-२, भाग-३वाचू शकता.)

आइंस्टाइनने असेही म्हणून ठेवले आहे कि, जेंव्हा प्रचंड वस्तुमानाच्या वस्तू एकमेकांभोवती फिरत असतील तेंव्हा त्यातून गुरुत्वलहरींचे (Gravitational waves) तरंग बाहेर पडतील त्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या अवकाशात याचे परिणाम (ripples in the fabric of space-time) जाणवतील आणि त्यावर प्रभावही टाकतील. या गुरुत्वलहरी अवकाशातून जातांना तेथील अवकाश चक्क आकुंचन आणि प्रसरण (contraction and expansion) पावेल. या गुरुत्वलहरींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या कुठल्याही वस्तुमधून प्रकाशाच्या वेगाने आरपार जाउ शकतील. त्यांच्यावर इतर कुठल्याही गोष्टी परिणाम करत नसल्यामुळे त्यांनी वाहून आणलेली माहीती अगदी 'जशी  आहे तशी' असेल. तसेच या लहरी ऐकल्या (in the audible range of 20-20Khz) जाउ शकतील.

आता या प्रचंड वस्तुमानाच्या म्हणजे नेमक्या किती वस्तुमानाच्या? तसे बघितले तर आपला सूर्य आणि पृथ्वी प्रचंड वस्तुमानाच्या आहेतच कि मग त्यांच्या एकमेकांभोवती पिंगा घालण्यातून गुरुत्वलहरी तयार होत नाहीत का? तर त्याचे असे आहे कि त्या प्रचंड वस्तुमानाच्या वस्तुंचे वजन हे आपल्या सूर्याच्या कित्तेक पट असायला हवे. आपला सूर्य आणि पृथ्वीच्या पिंग्यातून तयार होणारे तरंग अगदीच नाममात्र क्षमतेचे असावेत किंवा नसुही शकतील हे येणारा काळच सांगू शकेल.

(चित्र -अवकाश-कालाचे आकुंचन आणि प्रसरण Ripple in SpaceTime (Strain))

आइन्स्टाइनचे द्रुष्टेपण याच्यात आहे की, त्याने हे सर्व १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले. त्याकाळी असलेल्या तोकड्या साधनांमुळे त्याने असेही लिहून ठेवले कि, 'कदाचीत आपण मानव गुरुत्वलहरींचे अस्तित्व शोधण्यात कमी पडू शकु'. त्याच्या व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांताची सिद्धता जरी १९१९ सालच्या कंकणाकृती सूर्यग्रहणातून मिळालेली होती तरीही आत्ता LIGO निरिक्षण-कक्षाने पकडलेल्या गुरुत्वलहरींमुळे त्याच्या सिद्धांताला पुष्टीच मिळते.

LIGO चे महत्त्व 

आत्तापर्यंतच्या खगोलशास्त्राच्या निरिक्षण-शाळा(Observatories) या बव्हंशी विद्युतचुंबकिय तरंगावर (Electromagnetic waves) आधारित निरीक्षणे करीत असत. जसे दुरच्या ताऱ्याकडून आलेला प्रकाशाचे निरिक्षण (Doppler Effect), दुरच्या दिर्घिकेतून(Galaxy) आलेले रेडिओसंदेश, गॅमा किरणे (Gamma Ray Burst), भारित कण (उदा.-म्युऑन) वगैरे. 

Laser Interferometer Gravitational Wave Observatory (LIGO) निरिक्षण-शाळांना खरेतर खगोलशास्त्रिय प्रयोग म्हटले तर वावगे ठरू नये. ह्यांचे एकमेव उद्दिष्ट हे गुरुत्वलहरींना पकडणे हे आहे. त्यामुळे इतर कुठल्याही लहरींकडे LIGO दुर्लक्ष करते. अमेरिकेत असलेल्या LIGO ची लांबी ४-किमी आहे. त्यात लेसर किरणांचा उपयोग केला जातो. गुरुत्वलहरींमुळे अवकाश-काळाचे जे आकुंचन-प्रसरण(Strain) होते ते या लेसर किरणांच्या झोतावर परिणाम करते आणि त्या स्थानातून गेलेल्या गुरुत्वलहरींची हालचाल लेसर किरणांच्या झोतात झालेल्या हालचालींतून प्रकट होते. LIGO मधील उपकरणे अवकाश-कालाचे अतीसुक्ष्म आकुंचन प्रसरण(Strain) सुद्धा टिपू शकतात. अतीसुक्ष्म किती तर अणुत असलेल्या प्रोटॉनच्या लांबीचा १०००० वा भाग !

   (चित्र -अमेरिकेतील Louisiana येथील LIGO )

LIGO या एकट्या असू शकत नाही कारण नोंद झालेल्या गुरुत्वलहरी या नेमक्या अवकाशातुनच आल्या असून त्या स्थानिक भुगर्भातील (local seismic activity) वा इतर स्त्रोत्रांतून (other source) आलेल्या नाहीत याला दुजोरा (verify) द्यायला इतर काही अंतरावर आणखी काही LIGO असायला हव्यात. कदाचीत भविष्यातील LIGO भारतात व जपान मध्ये सुद्धा असतील.

LIGOला नेमक्या या लहरी कशा मिळाल्या, त्यात कुठली माहीती दडली होती, या लहरी ऐकायला कशा वाटतात वगैरे गोष्टींचा आढावा आपण पुढील भागात घेउ.

ता.क. - इथे एक गोष्ट आवर्जुन उल्लेख करावीशी वाटते ती अशी कि, 'चित्रलेखा' या नावाजलेल्या आणि सर्वाधीक मराठी वाचकवर्ग असलेल्या साप्ताहिकाने त्यांच्या २८-मार्च-२०१६ च्या अंकात प्रस्तुत लेखमालेची दखल घेतली आहे. 

                        ( चित्रलेखा - २८-मार्च-२०१६ )

  (PDF link - चित्रलेखा - २८-मार्च-२०१६)


(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)